पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पोलीस उपनिरीक्षकाने हटकल्याने चोरट्यांनी थेट गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी (दि.9) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे हे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्य़रत आहेत. तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्याजवळील कॉलनीत त्यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. शिंदे हे घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी कॉलनीत आले होते. त्यावेळी कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या बाहेर एक संशयित थांबल्याचे त्यांना आढळून आले. संशयिताने तोंडाला मास्क लावला होता.
त्यावेळी शाम शिंदे यांनी त्या संशयित व्यक्तीला हटकले ‘तू कोण आहेस, येथे कशासाठी आला आहेस, कोणाकडे आला, कोणाला भेटायचे आहे’ अशी विचारणा संशयिताला विचारले. त्यावेळी त्याने ‘ए चल तू तेरा काम कर, मै अलग टाईप का इन्सान हूँ’ असं उर्मट उत्तर दिलं. त्यानंतरही शाम शिंदे यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने खिशातील पिस्तूल बाहेर काढून शिंदे यांना दाखवले.
दरम्यान, शिंदे यांनी आरडाओरडा करून कॉलनीतील इतर लोकांना बोलावले. त्यांचा आवाज ऐकून बंगल्याच्या आत असलेला एक चोरटा बाहेर आला. त्याने भिंतीवरुन उडी मारून दोघांनी दुचाकीवरुन पळून जाऊ लागेल. त्याचवेळी कॉलनीतील काही जण त्याठिकाणी आल्याने संशयिताने पिस्तूलातून एक गोळी जमिनीवर झाडून पळून गेले.
या घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.