पुणे : बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. यावरून वाद रंगला होता. अखेर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल माफी मागत, संत तुकाराम महाराज हे भगवानाचे रूप असल्याचे म्हटले आहे. देहूतील मंदिरात येऊन त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून पुण्यात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या संघटनांनी विरोध केला. अखेर त्यांनी वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली. संत तुकाराम महाराज देवताप्रमाणे आहे. माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे.
माझे वक्तव्य बुंदेलखंडी भाषेत बोलताना चुकून आले. त्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी क्षमा मागतो. देहू येथील मंदिरात जाऊन मी दर्शन घेणार आहे. संतांचा विरोध कोणीच करू शकत नाही, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं होतं.
पुण्यात झालेल्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भीम आर्मी एकता बहुजन संघटनेकडून त्यांना विरोध दर्शविण्यात आला होता. त्यापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांनी दोनदा माफी मागितली.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. देहू संस्थानच्या वतीने धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा सत्कारही करण्यात आला.