पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर लवकरच झोपडपट्टी मुक्त करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. शनिवारी सकाळी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिकेच्यावतीने आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीय सोडत अजित पवार यांच्या हस्ते झाली.
अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास होत आहे. या शहरात मराठवाडा, विदर्भ, खान्देशातून जास्त प्रमाणात मजूर आणि कामगार काम शोधण्यासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका आणि राज्य शासनाची आहे. त्यांच्यासाठी महापालिकेकडून पिंपरी आणि आकुर्डी येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. शहरातील प्रत्येकाला चांगले आणि हक्काचे घर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
सोलापूरला कामगारांसाठी ३६० एकरमध्ये ३० घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम मजुरासाठी घरे बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे आदी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
९३८ घरांची सोडत…
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी व पिंपरी येथे स्वस्त घरकुल योजना प्रकल्प राबविण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये आकुर्डी येथे ५६८ तर पिंपरी येथे ३७० अशा एकूण ९३८ सदनिका आहेत. आकुर्डी प्रकल्पाकरिता ६६७२ अर्ज व पिंपरी प्रकल्पाकरिता ४६१५ असे एकुण ११२८७ अर्ज प्राप्त झाले होते.
अजित पवार म्हणाले, ज्यांना घर मिळाले त्यांचे अभिनंदन ज्यांना घरे मिळाली नाहीत. त्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करा. तसेच ज्या लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत. त्यांना वेळेत घर महापालिकडून देण्यात यावे, त्यात दिरंगाई करू नका असा सल्ला शेखर सिंह यांना अजित पवार यांनी दिला. तसेच एजंटांना बळी पडू नका असे आवाहनही पवार यांनी केले.