पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिनांक १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्वात व्याख्याने, पोवाडे, लोककला, परिसंवाद, ऑर्केस्ट्रा, वृक्षारोपण, रोजगार मार्गदर्शन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, ग्रंथदिंडी, असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ५ दिवस निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात घेण्यात येणार आहे.
१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय भवनात तसेच भक्ती शक्ती, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता चंदन कांबळे प्रस्तुत स्वर चंदन या गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून सकाळी ११.०० वाजता पल्लवी घोडे हे प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करतील. दुपारी १२.३० वाजता साहित्याचा राजा अण्णा माझा हा कार्यक्रम राजू जाधव हे सादर करतील. दुपारी १.३० वाजता मयूर खुडे प्रस्तुत ही चंद्राची चांदणी या प्रबोधनपर गीतांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, त्यानंतर दुपारी ३.०० वाजता बँन्ड स्पर्धा होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम कोमल पाटोळे सादर करणार आहे. सायंकाळी ६ वाजता गीते अण्णा भाऊंची हा कार्यक्रम साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण हे सादर करतील. त्यानंतर रात्री ८ वाजता ज्ञानेश कोळी प्रस्तुत ५० कलाकारांचा भूपाळी, वाद्यमुखी, पिंगळा, वासुदेव, कलास्पर्धा, जोगवा अशा महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडवणा-या भव्य कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता होईल. तर, शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी सनई वादनाने प्रबोधन परवाच्या दुस-या दिवसाची सुरुवात होईल. रविवारपर्यंत विविध कार्यक्रम होतील.
सोमवारी समारोप होईल. १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यानिमित्त १०४ रोपट्यांचे वृक्षारोपण, १०४ ग्रंथांची ग्रंथदिंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये १०४ वारकरी सहभागी होणार आहेत, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन, समाज विकास विभाग विविध योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आदी बाबत माहिती कक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.