पिंपरी : मुळशी तालुक्यातील घोटावडे गावच्या हददीत शेळकेवाडीफाटा परिसरात फूड ऑफिसर असल्याची बतावणी करून 25 हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक वागपुरी गोस्वामी (वय-31, रा. शेळकेवाडी घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे, मुळ रा. अबरुड, ता. रेवदर, जि. शिरोडे, राजस्थान) यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राजेंद्र मोहन पाटेकर (वय 58, रा. संत तुकारम नगर, वॉटर टॅक जवळ, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितूनसार, घोटावडे ता मुळशी जि पुणे गावच्या हददीत शेळकेवाडीफाटा येथील बधाई स्वीट होम येथे असताना आरोपी राजेंद्र पाटेकर याने त्याचे नाव राठोड, फुड ऑफीसर असल्याचे सांगून ‘मै यहा का फूड इन्स्पेक्टर हूं, मैने तुम्हारे कारखाने का व्हिडोओ बनाया है. 6 लाख रुपये का दंड हो जाएगा, अगर ऐसा किया तो मुझे अभी 25 हजार देना होगा, असा दम देवुन कारवाई करण्याची भिती घालुन पैशाची मागणी केली.
त्याचे सोबत आलेल्या कॅब चालकाच्या मोबाईल स्कॅनरवर 24 हजार रुपये ऑनलाईन पाठवुन व 1 हजार रूपये रोख, असे एकूण 25 हजार रुपयाची खंडणी घेवुन फुड ऑफीसर असल्याचे सांगुन फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांचे आदेशाने पुढील तपास पोलीस हवालदार सुपे करीत आहेत. दरम्यान, यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ७ पेक्षा अधिक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.