( Dehu News )पिंपरी : ‘तुकोबांचा छंद लागला मनासी, ऐकता पदांसी कथेमाजीं, तुकोबाची भेटी होईल ते क्षण, वैकुंठासमान होये मज’ या संत बहिणाबाईंच्या अभंगानुसार तुकाराम बीजेनिमित्त श्री क्षेत्र देहू (dehu)येथे राज्यातील लाखो वारकऱ्यांनी देहूनगरीत (dehunagari) गर्दी केली होती. निमित्त होते जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळ्याचे…
देहूत बीज सोहळा मोठ्या उत्साहात ; लाखो वारकऱ्यांची उपस्थिती…
हाती टाळ, कपाळी गंध, खांद्यावर पताका अन् मुखाने तुकोबांचा जयघोष करीत बीजेचा सोहळा ‘याची देहा, याची डोळा’वारकऱ्यांनी अनुभवला. लाखोंच्या संख्येने वारकरी तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले होते.जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj)यांच आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
बीज सोहळ्याच्या निमित्ताने देहू नगरीतील भव्य दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. पहाटे साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. पहाटे सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली.
सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले. दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…