पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले आहे, असं सांगत ४० जणांकडून गुंतवणूक म्हणून १ कोटी १२ लाख २८ हजार रुपये घेतले. मात्र, डी मॅट अकाउंट तयार न करता त्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखली येथे पूर्णानगरमध्ये २०१५ ते ५ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सीताराम खाडे आणि त्याचे वडील सीताराम खाडे (रा. खटाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. सुहास बजरंग शेजवळ (वय-५६, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडे पिता-पुत्रांनी आपसात संगनमत करून फिर्यादी सुहास शेजवळ आणि त्यांचे सहकारी मित्र नवनाथ तानाजी दळवी, संजय शंकर शेकडे आणि इतर ३७ जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पडले. आम्ही तुमचे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले आहे, असं सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी सुहास यांच्याकडून १० लाख ३८ हजार रुपये, तर इतर ३९ जणांकडून १ कोटी १ लाख ९० हजार रुपये असे एकूण १ कोटी १२ लाख २८ हजार रुपये रोख आणि धनादेशाद्वारे घेतले. सुरुवातीला फिर्यादी आणि इतर लोकांना काही दिवस परतावा मिळाला. मात्र, त्यांनतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतर खाडे पिता-पुत्राने परतावा देणे बंद केले. तसेच फिर्यादी सुहास आणि इतर ३९ जणांना एलकेपी कंपनीचे खोटे प्रमाणपत्र देत फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक तपास करीत आहेत.