पिंपरी-चिंचवड: बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. यात दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई आळंदी व वडमुखवाडी येथे करण्यात आली.
पहिली कारवाई आळंदी येथे…
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 30 मार्च) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर करण्यात आली. येथे एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गिरीराज चिम्मनराम बैरवा (वय 35, रा. आळंदी. मूळ रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आढळले. त्यानंतर पिस्तूल जप्त करून गिरीराज याला अटक केली आहे.
दुसरी कारवाई वडमुखवाडी येथे…
त्यानंतर, सोमवारी (दि. 31 मार्च) ला दुसरी कारवाई वडमुखवाडी येथील शाळेच्या पाठीमागील मैदानात करण्यात आली. केत बाळासाहेब दौंडकर (वय 23, रा. कनेरसर, ता. खेड) असे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वडमुखवाडी येथील शाळेच्या पाठीमागील मैदानात एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संकेत दौंडकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. अधिक तपास दिघी पोलीस तपास करीत आहेत.