पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये शाळकरी मुलीशी एका शिकवणी चालक शिक्षकाकडुन अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणात शिकवणी चालकाला विशेष न्यायाधीश सोनाली राठोड यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत शाळकरी मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर शिकवणी चालक शिक्षकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील आरोपी आणि त्याची पत्नी शिकवणी चालक आहेत. पीडित मुलगी आणि तिची मोठी बहीण त्यांच्याकडे शिकवणीला जात होते. हे प्रकरण २०१७ मधले आहे. त्यावेळी पीडित मुलगी चौथीत होती. पीडित मुलगी शिकवणीला गेली असता त्या वेळी आरोपीने मुलीशी अश्लील कृत्य केले होते. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणात आता न्यायालयाने आरोपी शिकवणी चालकाला पाच वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या दंडाच्या रकमेतून आठ हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.