पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात तीन तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा छापल्याने दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांकडून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी बोडकेवाडी फाटा, माण-हिंजवडी रोड येथे पोलीसांनी ही कारवाई केली असून अभिषेक राजेंद्र काकडे (वय 20), ओंकार रामकृष्ण टेकम (वय 18, दोघे रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हिंजवडी परिसरातून माणकडे जाणार्या रस्त्यावर हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी विना नंबरप्लेटच्या मोटारसायकलवर तिघे बसून जात होते. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केल्यावर त्यांनी वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता ५०० रुपयांच्या २४० नोटा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, घरातच या नोटा छापल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नोटांची उत्कृष्ठ क्वॉलिटी पाहता यामध्ये परराज्य अथवा परदेशातील काही लोकांचा सहभाग आहे का हे पडताळून पाहिले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.