पिंपरी : कॉन्स्टो २०२४ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मोशी येथे ४ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. मोशी येथे या प्रदर्शनासाठी ३० हजार चौरस मीटर जागेवर प्रशस्त शेड उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) मोशी येथील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात (पीआयईसीसी) प्रदर्शन भरवण्यात येत आहे. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी पीएमआरडीचे मुख्य अभियंता अशोक भालकर, रिनाज पठाण, उपायुक्त रामदास जगताप, कॅान्स्ट्रो २०२४ प्रदर्शनाचे अध्यक्ष जयंत इनामदार, पुणे इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेन कोठारी, बिल्डर असोशिएशन ॲाफ इंडियाचे अध्यक्ष चौधरी उपस्थित होते.
बांधकाम उद्योगातील अद्ययावत यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. ४ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पोची ही १८ वी मालिका आहे.
जयंत इनामदार म्हणाले, पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीईआरएफ) यांच्यातर्फे प्रदर्शन आयोजित केले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कन्सेप्ट पार्टनर तर पिंपरी-चिंचवड महापालिका सहयोगी भागीदार आहेत.
आयुक्त राहुल महिवाल म्हणाले, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व विभागातील बांधकाम व्यावसायिकांसाठी प्रदर्शन ही एक उत्तम संधी असेल. हे प्रदर्शन आर्किटेक्चर आणि स्थापत्य अभियांत्रिकी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना नवीन विकासकामे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीनतम बांधकाम उपकरणे व साहित्य समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.