पुणे : पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता. यामुळे तो भेटण्यासाठी प्रियसीला टाळत होता. तसेच तिला तो सतत त्रास देत होता. यामुळे एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना हिंजवडी येथील आयआयएमएस महाविद्यालयाच्या मुलींच्या डेल्टा हॉस्टेलमध्ये ३ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. मुलीच्या वडिलांनी रविवारी ४ फेब्रुवारीला हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडीया कुमारी ही हिंजवडी येथील आयआयएमएस महाविद्यालयात एमबीएचं शिक्षण घेत होती. मागील दोन ते तीन वर्षांपासून तिचं अश्वनी याच्यासोबत अफेअर होतं. पण काही कारणांमुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. अश्वनी तिला सातत्याने अपमानास्पद वागणूक देत होता.
त्याशिवाय त्याचं दुसऱ्या एका मुलीसोबतही अफेअर जुळलं होतं. या सततच्या त्रासाला कंटाळून गुडीया कुमारी हिने टोकाचं पाऊल उचललं. याबाबत मयत मुलीचे वडिल भोलासिंग परमात्मा प्रसाद सिंग (वय-48 रा. मसत्थुता-बाड, जि. पटना बिहार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.