पुणे : ”गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा”, या चित्रपटातील एका सीनमध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे हे आमदारकीचा अर्ज भरण्यासाठी चिल्लर घेऊन गेले होते. आणि आमदारकीच्या निवडणुकीचा अर्ज भरला होता. याच चित्रपटातील दृश्याप्रमाणे चिंचवडच्या पोटनिवडणुकांसाठी डिपॉझिट भरण्यासाठी १० हजारांची चिल्लर आणली होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्जाच्या शेवटच्या दिवशी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी १० हजारांची चिल्लर आणली होती. गल्लीत गोंधळ दिल्लीत मजुरा या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्येही अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याची पुनरावृत्ती चिंचवडमध्ये झाली आहे.
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा पेठची पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यामध्ये हेमंत रासने उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये कसब्याची जागा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीचे नाना काटे लढवत आहेत. पण या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला बंडाचे ग्रहण लागल आहे.
दरम्यान, कसब्यामध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी तर चिंचवडमध्ये शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय कसब्यामध्ये हिंदू महासंघाचे आनंद दवे हे देखील रिंगणात उतरले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आनंद दवे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.