पिंपरी – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आज रविवारी (ता.२६) मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदानादरम्यान भाजपचे माजी नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये पिंपळेगुरव माध्यमिक विद्यालय केंद्रात सकाळच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.
चिंचवडमध्ये सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत होत आहे. या लढतीदरम्यान पिंपळेगुरव येथील भाजपचे माजी नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली.
दरम्यान, आज पोटनिवडणूकीचे मतदान होत असून त्याला गालबोट लागले. बंडखोर राहुल कलाटेंचे समर्थक आणि भाजपाचे माजी नगरसेवक एकमेकांना भिडले. काही काळ यामुळे तणाव निर्माण झाला होता.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी हा वाद मिटवला. यानंतर मात्र पोलिसांनी अधिक ची कुमक मागवण्यात आली होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १३ संवेदनशील मतदारसंघ असून तिथं देखील मोठा पोलीस फाटा आहे.