पिंपरी-चिंचवड: पिंपरीत पुमा से कंपनीच्या नावाचा आणि चिन्हाचा वापर करून बनावट शूज आणि चप्पल विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी मधील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई गुरुवारी (24 एप्रिल) ला दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दयाराम अँड सन्स या दुकानात कारवाई करण्यात आली आहे.
नितीन रमेश नथराणी (वय 33 वर्ष, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी योगेश दशरथ मोरे (वय 48 वर्ष, कोथरूड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुमा से कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीची मालकी असलेल्या नावाचा आणि चिन्हाचा बनावट शूज आणि चपलांवर वापर करून आरोपीने त्याची विक्री केली.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर योगेश मोरे यांनी पिंपरी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पिंपरी पोलिसांनी कारवाई करत 7 लाख 59 हजार रुपये किमतीच्या शूज आणि चपला जप्त केल्या आहेत.