पिंपरी-चिंचवड : तरुणाला चाकूने जखमी करणाऱ्याला पकडण्यास गेलेल्या दोन पोलिसांच्या हाताला एकाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २२ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास धनगरबाबा मंदिराच्या मागे थेरगाव येथे घडली आहे.
सुरज चंद्रकांत कुऱ्हाडे (वय-२२, रा. धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार मच्छिंद्र व्हरकटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार व्हरकटे आणि दिनकर पोंदकुले हे विलास कांबळे यांच्या मदतीसाठी गेले होते. त्यावेळी तिथे आरोपी सुरज याने विलास कांबळे या व्यक्तीला चाकूने मारून जखमी केले होते. कांबळे यांना चाकूने जखमी केलेला आरोपी सूरज कुऱ्हाडे याला तू पोलिस ठाण्याला चल असे म्हणाले. त्यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ करून तेथून पळून जाऊ लागला.
त्यामुळे फिर्यादी व पोंदकुले यांनी आरोपी सुरजला पकडले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन जखमी केले. तसेच त्यांच्या मदतीला आलेले काळेवाडी मार्शलचे पोलिस अंमलदार सत्यनारायण पिल्लामारी यांच्याही उजव्या दंडाला जोरात चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.