पुणे : जुनी सांगावी परिसरात वीज वाहिनीचे काम करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला लाईट का घालवली म्हणून तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वैभव गवारे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर आरोपीचे वडील व मित्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रत्नदीप मनोहर काळे (वय-39 रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी परिसरात वीज जोडणीचे काम करत असताना तिघांनी मिळून वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल बाळासाहेब गायकवाड, प्रसाद अनिल गायकवाड, बद्रीनाथ सुभाष जाधव यांना लाईट का घालवली म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच हाताने मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणला. यावरून सांगवी पोलसानी एकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.