पुणे : पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरु झाली आहे. मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज मंगळवारपासून (ता.३१) चालू झाली आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मंगळवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. मात्र प्रमुख पक्षांनी अद्याप या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित केलेला नाही.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे शहर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख हे काम पाहणार आहेत. तर चिंचवड विधानसभेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया पुढीलप्रमाणे…
१) उमेदवारी अर्ज – ७ फेब्रुवारी पर्यंत
२) छाननी – ८ फेब्रुवारी
३) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १० फेब्रुवारी
४) मतदान – २६ फेब्रुवारी
५) मतमोजणी – २ मार्च
६) कसबा विधानसभेसाठी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच
७) चिंचवड विधानसभेसाठी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालय