-संगीता कांबळे
पिंपरी : मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. सततधार पावसामुळे शहरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते. परिणामी नदीपात्रातील पाणी पातळी वाढल्याने नदी काठच्या परिसरात पाणी शिरले होते. तो परिसर चिखलमय झाला असून परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलेले आहे. परिणामी रोगराई पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असून पाऊस उघडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात संततधार पावसामुळे आजही शहरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र, पवना, इंद्रायणी नदीपात्रात टाकलेला भराव, नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण करून दिलेल्या बांधकाम परवानगीमुळे शहरातील अनेक सोसायटीत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले. तसेच नदीकाठच्या व कासारवाडी पिंपरी गाव, फुगेवाडी मोरवाडी, लालटोपी नगर, दापोडी आदी सखल भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले.
महापालिकेने योग्य साफसफाई न केल्याने सगळे रस्ते जलमय होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्व स्टॉर्म वॉटर लाईन स्वच्छ केलेल्या नाहीत. नदीवरील पूल, रस्त्यावरील पूल, रेल्वे पूल, त्यांच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होणारे सर्व मार्ग मोकळे केले नाहीत. नाले, ओढे, स्टॉर्म वॉटर लाईन गटारे स्वच्छ केलेले नाहीत. नाल्यावरील अतिक्रमण काढले नाही. नाल्यास अडथळा ठरणारे पाईप लाईन, केबल, सर्व्हिस लाईन स्थलांतरित करून अडथळा दूर केलेला नाही. परिणामी पूरस्थिती निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
महापालिकेने वेळीच कामे करून साफसफाई केली असती, तर हे पाणी आज साचून राहिले नसते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. चिखल, आणि निर्जंतुकिकरण करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.