पुणे : वानवडीतील राज्य राखीव पोलीस दल गट एक आणि दोन येथील संकुलात तेहतिसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ७ ते १२ जानेवारी दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी राज्यातील अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडू पुण्यात येत असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे.
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या आदेशानुसार या स्पर्धेचे आयोजन पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेची सुरुवात शनिवारी होणार असली, तरी औपचारिक उद्घाटन ११ जानेवारीला दुपारी चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे ; तसेच १३ तारखेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी दिली. या वेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपकुमार सिंह आणि सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.
दरम्यान, या स्पर्धेमध्ये १८ क्रीडा प्रकारांचा समावेश असून, यामध्ये १३ संघ सहभागी होतील. तीन हजार महिला व पुरुष खेळाडू, संघ व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, पंच, वरिष्ठ अधिकारी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचा एक संघ सहभागी होणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींसाठी समारोपाच्या दिवशी सकाळी गोळीबार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.