पिंपरी : खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मोजणीसाठी विरोध करत शिवीगाळ तसेच धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच तीन महिलांनी स्वत:च्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी चाकण पोलिसांनी तीन महिलांसह 11 जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही घटना मंगळवारी 2 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत खेड/राजगुरूनगर भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भुमापक धनंजय अशोक ठाणेकर (वय-41 रा. नागेश्वर मंदीराजवळ, सोमवार पेठ, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गणेश बाळासाहेब साबळे, नामदेव बबन साबळे, चांगदेव बबन साबळे, संदीप नामदेव साबळे, भरत भाऊसाहेब साबळे, बाळराजे चांगदेव साबळे, बापू चांगदेव साबळे, पेटवून घेणाऱ्या तीन महिला आणि अन्य एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी उपअधीक्षक भुमिअभिलेख कार्यालय खेड येथे परिरक्षण भुमापक म्हणून कार्यरत आहेत. खेड दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या मदतनीस याला घेऊन साबळेवाडी येथील सिद्धेगव्हाण या जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी गेले होते. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी जमिनीची मोजणी करत असताना आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यास विरोध करुन फिर्यादी यांना निघून जाण्यास सांगितले.
धनंजय ठाणेकर यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून एका मदतनीसाला धक्काबुक्की केली. तसेच जीपीएस मशीन ओढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, तीन महिलांनी स्वताच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चाकण पोलिसानी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.