पिंपरी : पुण्यातील दिघी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घटस्फोट झाल्याचे सांगून लष्करातील जवानाने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना जून २०२० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील जवानावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप तुकाराम जाधव (वय -४० रा. वाळवा, सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने शुक्रवारी २ फेब्रुवारीला दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप जाधव हा भारतीय लष्करात नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे. दरम्यान, त्याने विवाह जुळणाऱ्या वेबसाईटवरून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर प्रदीप याने पीडित महिलेला आपला घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगितले.
तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी प्रदीप जाधव याच्या विरोधात तक्रार दाखल केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शभू रणवरे करत आहेत.