Ambedkar Jayanti 2023 | पुणे : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जनसममुदायाची मोठी गर्दी दिसून येत आहे.
डॉ. बाबासाहेब यांच्या पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या येत असतात. रात्रीपासून नागरिकांची गर्दी जमू लागली होती. कुंटुंबासह नागरिक मोठ्या उत्साहाने बाबासाहेबांना अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करत होते.
लहान मुलांची मोठी गर्दी यावेळी दिसून आली. तसेच परिसरात बाबासाहेबांच्या प्रतिमा विक्रीचे मोठे स्टाॅल उभारण्यात आले आहेत. पुस्तकांचेही दुकाने थाटली आहेत. विविध संघटनांनी स्वागत कमानी उभ्यारल्या आहेत. नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूकीत बदल देखील करण्यात आला आहे. अभिवादन सभेसाठी सभा मंडप उभारण्यात आला आहे. संघटनांकडून नागरिकांसाठी विविध सेवा दिल्या जात आहे.
घरोघरी जंयती मोठ्या आनंदात साजरी…
एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने आणि भीम गीतांनी परिसर दुमदुमूला. शहरातील मुख्य चौकांसह घरोघरी जंयती मोठ्या आनंदात साजरी होत आहे.
विश्रांतवाडी भागातील मुख्य चौकात रात्री बारा वाजता भीम जयंतीच्या स्वागतासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सुमारे सलग दीड तास फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.नागरिकांच्या गर्दीमुळे या भागात सुमारे दोन तास वाहतूक एकाच जागी ठप्प झाल्याचे दिसून आले.