पिंपरी चिंचवड : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही, तरीही मावळमध्ये माझा 2 लाख 50 हजार 374 मतांनी विजय होईल, असा दावा मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. तसेच माझा प्रचार न करणाऱ्यांची नावं मी अजित पवार यांच्याकडे दिले आहेत, असंही बारणे यांनी यावेळी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी संपले. असं असताना महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत.
श्रीरंग बारणे पुढे म्हणाले, अजित पवार गटाने माझा शंभर टक्के प्रचार केला असता, तर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे डिपॉझिट जप्त झाले असते, असा दावा देखील बारणे यांनी केला. ते म्हणाले, मावळच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. या मतदारसंघात पनवेल आणि पिंपरी चिंचवड शहर ही दोन मोठी महानगरं आहेत. याठिकाणी महायुतीला मानणारा मोठा वर्ग असून येथे उबाठा गटाची ताकद नाही.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार मतांपैकी मला दोन लाख मतं मिळतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 1 लाख 80 हजार मतदान पडले आहे. या दोन मतदारसंघांत मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही, असा दावा श्रीरंग बारणे यांनी यावेळी केला.