पिंपरी : लोकसभा निवडणुकीचे सध्या सर्वत्र वारं वाहू लागलं आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभांचा जोरदार धुराळा सुरु आहे. यामध्ये एकमेंकावर टीकेचं झोड उडताना दिसत आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरीत आज मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
जयंत पाटील म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्या लोकांना पाडण्यासाठी सतत प्रयत्न केले जात होते. ज्यांना मागीलवेळी पाडले, त्यांनाच आता उमेदवारी देऊन त्यांच्याच प्रचार करण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली आहे. त्यांच्याबद्दल मला मनापासून वाईट वाटते. एखाद्याची एवढी वाईट अवस्था होऊ नये, अशी टीका जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली.
देशावर २१० लाख कोटींचे कर्ज
पाटील म्हणाले, देशावर २१० लाख कोटींचे कर्ज असून शेतकऱ्यांच्या अवजारांवर, अन्नधान्यांवर वस्तू सेवा कर लावला आहे. जनतेकडून पैसे लुटण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस महाग झाला. काँग्रेसच्या सत्ता काळात गॅसची किंमत चारशे रूपये होती. आता तोच गॅस एक हजारांच्या पुढे गेला आहे. देशाचे वातावरण बदलले असून संपूर्ण देश भाजपच्या विरोधात आहे. दहा वर्षात काय केले, याचा जाब देशातील जनता भाजपच्या उमेदवारांना विचारत आहे. मात्र, त्याचे उत्तर उमेदवारांना देता येत नाही.
काही लोक सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे. मात्र, त्यांची संधी मागच्यावेळीच गेली आहे. आता नवीन चेहरा आहे. परिस्थिती वेगळी आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वळचनीला असलेल्या एका पक्षात जावून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करण्याची मानसिकता जनतेमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण चांगले आहे, मतदारांच्या घरापर्यंत पोहचावे, त्यांना मतदानासाठी बुथपर्यंत आणावे, चिन्हाबाबत गैरसमज पसरविण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे घराघरापर्यंत तुतारी चिन्ह पोहचविले पाहिजे, असे आवाहन शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.