पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्याच्या या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या (सोमवारी ता.22) वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर एक दिवस आधीच शुभेंच्छांचा वर्षाव होतं असल्याचे दिसून येत आहे. अशातच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी या निमित्ताने जोर धरत असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुणे, पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहे.
या दौऱ्यावेळी त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच केक कापत त्यांचा जन्मदिवस साजरा केला आहे. पण यावेळी विशेष ठरला तो म्हणजे अजित पवारांसाठी आणलेल्या केकची. त्या केकची चर्चा सुरू झाली आहे. कारण अजित पवारांसाठी आणलेल्या केकवरती ‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!’, असं लिहण्यात आलेलं होतं.
अजितदादांसाठी आणलेल्या या केकची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आगामी काळात मुख्यमंत्री पद मिळावं अशा शुभेच्छा त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक देताना दिसून येत आहेत. राज्यात अनेकदा त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर देखील लावलेले दिसून आले होते. मात्र, सध्या या केकची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आणलेला हा केक स्वतः अजित दादांनी कापत या शुभेच्छांचा स्वीकार ही केला आहे. पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील आदिराज शितोळे आणि समर्थकांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
शरद पवारांनी बालेकिल्ल्यात धक्का दिल्यानंतर अजित पवार हे सक्रिय हझाल्याचं दिसून येत आहे. काल शरद पवारांची सभा झाल्यावर आज अजित पवार याठिकाणी मेळावा घेत आहेत. तत्पूर्वी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याशी ते व्यक्तिगत संवाद सुद्धा साधणार आहेत. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी तुतारी फुंकल्यावर अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय झाले आहेत. शरद पवारांनी आपल्या शिलेदारांना आपल्याकडे खेचू नये म्हणून अजित पवार तयारीला लागले आहेत.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा उद्या वाढदिवस..
उद्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर मंत्रालयासह विधानभवन परिसरात लागल्याचे दिसून येत आहेत.