पिंपरी : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने कारमधून १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली आहे. कारचालक पियुष जखोडीया (वय ३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या मोटारीची तपासणी केली असता कारमध्ये रोकड सापडली. कार चालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली असल्याचे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात सोमवारी रात्री एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलाच ढवळून निघालं होतं. असं असताना आता पुन्हा एकदा मावळमध्ये पावणे अठरा लाखांची रक्कम जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.