पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड येथे वीट डोक्यात घालून तरुणाचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहीणीवर मित्राने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून मानलेल्या भावाने वीट डोक्यात घालून तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ एप्रिल रोजी भूमकर वस्ती, वाकड येथील भामा पर्ल सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकेतकुणाल विजयकुमार सिंह (वय-२८, रा. भुजबळवस्ती, वाकड) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोकेंद्र किशोरसिंह (वय-२८, रा. दत्त मंदिर रोड, वाकड, मूळ रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांनी १० रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोरसिंहची मानलेली बहीण आणि मृत निकेतकुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते. ३ एप्रिल रोजी रात्री कंपनीतील सहकारी पार्टीसाठी एकत्र जमले होते. पार्टी झाल्यानंतर पीडित तरुणी सहकारी निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर थांबली. यावेळी निकेतकुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे पीडित तरुणीने तिचा मानलेला भाऊ लोकेंद्र किशोरसिंहला सांगितले.
त्यानंतर किशोरसिंहचा राग अनावर झाला. तो संतापलेल्या अवस्थेत निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर गेला. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी लोकेंद्रने सोबत आणलेली वीट निकेतकुणालच्या डोक्यात घातली. यामध्ये निकेतकुणाल गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. मात्र, रात्री झोपेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.
गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दरम्यान,निकेतकुणालला रुग्णालयातून घरी आणल्यावर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल आणि आपली बदनामी होईल, या भीतीने निकेतकुणाल याने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला होता. त्याच्या गळ्याभोवती व्रण आढळून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे, पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात निकेतकुणाल याच्या डोक्याला मार लागल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.