पिंपरी : हिंजवडी परिसरात हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसाच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. १५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.
वैभव प्रल्हाद वारडे (वय-३९, रा. गुरुव्दारा रस्ता, आकुर्डी निगडी), हाॅटेलचा व्यवस्थापक सोहम दीपक कदम (वय-२३, रा. वाकड पोलिस लाइन, वाकड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार आकाश हंबर्डे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३ (डब्ल्यू)सह १३१ सह सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार वाणिज्य व पुरवठा विनियमन) अनिधिनयमचे कलम ४, ७, २१ व सुधारणा अधिनियम सन २०१८ चे ४ (अ), २१ (अ) अन्वये पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सोहम कदम हा हाॅटेलचा व्यवस्थापक आहे. त्याचे दिवंगत वडील दीपक कदम हे पोलिस होते. ते वाकड येथील पोलिस वसाहतीमध्ये राहण्यास होते. संशयित व्यवस्थापक सोहम कदम आणि वैभव वारडे यांनी त्यांच्या हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु केले. याबाबतची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली. या कारवाई मध्ये १ हजार ८०० रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पुनम जाधव करीत आहेत.