पुणे : लोणावळा शहरातील गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. पल्लोड यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या गुन्हयात मूळ १४ आरोपी होते. मात्र, मुख्य आरोपी किसन परदेशी याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, गुन्हयातील १३ आरोपी निर्दोष सुटले आहेत.
राजेश भारत पिंपळे (वय-२९, रा. कैलास नगर लोणावळा) व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड (वय-२७ रा. लोणावळा ता. मावळ जि. पुणे) हे दोघे १८ जुलै २०१५ पासून बेपत्ता झाले होते. २० जुलै रोजी अक्षयचे वडील श्रीपाल श्रवण गायकवाड (रा. सिध्दार्थ नगर, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात मनुष्य मिसिंगची फिर्याद दिली होती.
नेमक प्रकरण काय?
राजेश भारत पिंपळे आणि अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड या दोघांना आरोपी किसन नथू परदेशी (रा. गावठाण, लोणावळा ता. मावळ) याने अंडा भुर्जीच्या गाडीच्या जागेवरून आणि जागेच्या भाड्यावरून वाद झाले होते. याचाच राग डोक्यात ठेवून पिंपळे आणि गायकवाड या दोघांना बळजबरीने स्वतःच्या कारमध्ये घेऊन जात त्यांचा खून केला होता. तसेच दोघांचे मृतदेह मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात दरीत फेकून देऊन, खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले होते.
त्यानंतर लोणावळा शहर पोलिस ठाण्यात ४ ऑगस्ट २०१५ रोजी खुनाचा कट कारस्थान करून पळवून नेऊन खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. १८ सप्टेंबरला किसन परदेशी व त्याचे साथीदार आरोपी शारदा उर्फ आप किसन परदेशी (वय-४९), यास्मिन लतीफ सैयद (वय-३६), अजय कॄष्णण केसी (वय-२२), अश्विन चंद्रकांत शिंदे (वय-२९), सुनील बाबू पटेकर (वय-४९), विकास उर्फ गोग्या सुरेश गायकवाड (वय-२४), जगदीश उर्फ जग्गू मोरे, सादिक इब्राहिम बंगाली, विनायक उर्फ विनय ढोरे, आकाश सतीश चांडिल्य, ब्रिजेश उर्फ बंटी डावरे, सलीम शेख, सुभाष उर्फ महाराज गोविंद धाडगे या १४ आरोपींना संशयावरून पोलिसांनी या प्रकरणी अटक केली होती.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत एकूण १४ आरोपींच्या विरोधात वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. खटला गंभीर स्वरुपाचा असल्याने खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकीलांची नेमणूक केली होती. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात १४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या होत्या. आरोपींना पोलिसांनी न झालेल्या खुनाच्या खटल्यात विनाकारण गोवले असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.