पिंपरी : पुण्यातील मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात ७ वर्षीय चिमुकलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी उघडकीस आली होती. तिचा मृतदेह जवळच एका झुडुपात आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २४ तासात आरोपीला अटक केली होती.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज शुक्रवारी 22 मार्च रोजी शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपीच्या आईलाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले असून न्यायालयाने ७ वर्षांची सजा सुनावली आहे. तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (रा. कोथुर्णे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील ७ वर्षांच्या मुलीचे २ ऑगस्ट २०२२ रोजी अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी दळवीला अटक करण्यात आली होती.
या खटल्याची सुनावणी शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज अंतिम सुनावणी पार पडली असून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या आईचा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचं निष्पन्न झालं होतं. खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न गवळीच्या आईने केला होता. याप्रकरणी तिलाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.