पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाचा खून केल्याच्या रागातून तरुणाने साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेरगावमधील जगतापनगर येथे शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते रविवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. साहिल राहुल साबळे (वय-१८, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी साहिल याच्या आईने वाकड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुण परदेशी (वय-१९, रा. काळेवाडी), यश भगवान रोकडे (वय-२०, रा. बौद्धनगर, पिंपरी), अशपाक दिलशाद शेख (वय-२१, रा. बौद्धनगर, पिंपरी), प्रथमेश विष्णु हजारे (वय-२२), ओमकार कामत (वय-२४), लक्ष्मण कोळी (वय-२१) साहिल व त्याचे इतर साथीदार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा साहिल राहुल साबळे याने काही दिवसांपूर्वी आरोपीच्या भावाचा गणेश ऊर्फ दादु शांताबाई रोकडे याचा खून केला होता. या खुनाचा राग मनात धरुन आरोपीने साहिल याच्यावर खूप दिवसांपासून पाळत ठेवली होती.
दरम्यान, साहिल हा शनिवारी रात्री जगतापनगरमध्ये आल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्याला गाठून त्याच्या तोंडावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तसेच दगडाने ठेचून त्याचा खून केला. आपल्या भावाच्या खुनाचा बदला खुन करून घेतला.रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेची माहिती रविवारी सकाळी समजली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश नलावडे करीत आहेत.