पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. मोबाईल विकत घेतला. तसेच त्याचे पैसे देऊन टाक असे सांगितल्याच्या रागातून तिघा गुंडांनी चाकूने वार करुन तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. आकाश परदेशी (वय-२८, रा. महादेवनगर, भोसरी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील आरोपी किनवट येथून तेलंगणा राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान, आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
सत्यजित शंकर कांबळे (वय-२३, रा. महादेवनगर, भोसरी), निखिल राजीव कांबळे (वय-२१, रा. महादेवनगर, भोसरी, दोघेही मुळ रा. सावळेश्वरे ता. कंधार , जि. नांदेड), रमेश नामदेव कांबळे, देवानंद ऊर्फ गौरव रमेश कांबळे, मानव महेंद्र कांबळे (वय-२१, सर्व रा. महादेवनगर, भोसरी, मुळ रा. हडको, सिद्धेश्वर मंदिराजवळ, ता. जि. नांदेड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कांबळे याने कार्तिक साबे याचा मोबाईल १२ हजार रुपयांना विकत घेतला होता. त्यापैकी फक्त ५०० रुपये दिले होते. कार्तिक याने रमेशकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आकाश म्हटला कार्तिक लहान आहे, त्याचे राहिलेले पैसे देऊन टाक. तेव्हा रमेश कांबळे म्हणाला, जा नाही देत पैसे काय करायचे ते कर, असे म्हणून तो तेथून निघून गेला.
त्यानंतर रमेश हा त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्याने आकाश परदेशी याच्या पाठीत चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी त्याला वाय.सी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तीन तपास पथके तयार केली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी दिघी, कार्ला, लोणावळा, मुंबई, नांदेड येथे पथकाचे शोध कार्य सुरु आहे. नातेवाईक तसेच मित्रांकडे सखोल तपास केली जात आहे. तेव्हा गोपनीय माहिती समोर आली, काही आरोपी संभाजीनगर येथे आहेत.
त्यानुसार पोलिसांनी सलग तीन दिवस आरोपींचा माग करुन संभाजीनगर येथे १० ऑक्टोबर रोजी सत्यजित कांबळे आणि निखिल कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. नांदेड येथे गेलेल्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हवालदार भोसुरे, नांगरे, जैनक, मेरगळ यांनी नांदेड येथे सलग चार दिवस तेथे मुक्काम करुन आरोपींचा माग काढला.
दरम्यान, आरोपींचा नांदेड ते किनवट असा पाठलाग केला. रमेश कांबळे, देवानंद ऊर्फ गौरव कांबळे आणि मानव कांबळे यांना किनवट मार्गे तेलंगणा राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी महाराष्ट्र सीमेनजीक बोदडी गावाचे जंगलातून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींबाबत काही एक सुगावा नसताना गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने समांतर तपास करुन व माहिती काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा कौशल्यपूर्ण वापर करुन गुन्हा उघडकीस आणला.