तळेगाव स्टेशन : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अनिकेत घनश्याम तिवारी (वय-१८, रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे मूळ रा.अभंपूर – रायपूर, छत्तीसगढ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. २३) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत हा डी. वाय. पाटील कॉलेज आंबी (ता. मावळ) येथे शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी तो मित्रांसोबत तळ्यावर पोहण्यासाठी आला होता. या वेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. या घटनेची माहिती वन्य जीवरक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना देण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली, मात्र साडेसात वाजता अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा शुक्रवारी (दि. २४) सकाळी साडेसहा वाजता पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी ७.४५ वाजता अनिकेतचा मृतदेह सापडला. निलेश गराडे, अनिल आंद्रे, अनिश गराडे, गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, गणेश ढोरे, अविनाश कार्ले, कुंदन भोसले, ताहीर मोमीन, श्रीसंत भेगडे, कुणाल दाभाडे, शुभम काकडे, शेखर खोमणे, धीरज शिंदे यांसह तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अग्निशमन दल, पोलिस यांनी सहभाग घेतला.