पिंपरी : पोलीस वाहनाने महिलेसह दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून एका दुचाकीचेही नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार ४ जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली आहे.
नागेश भालेराव (नियुक्ती, हिंजवडी पोलीस ठाणे), असे चालक पोलीस अंमलदाराचे नाव आहे. या अपघात शंकुतला पंडित शेळके (रा. महाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ड्युटीवर असलेले अंमलदार नागेश भालेराव शासकीय वाहनात बसले होते. त्यावेळी वाहनाचे इंजिन सुरु होते.
दरम्यान, भालेराव यांचा पाय वेग वाढवण्याच्या पेडलवर (ऍक्सीलेटर) पडला. त्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली असून एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक झालेल्या आवाजामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शकुंतला यांना पोलीस वाहनातून रुग्णालयात दाखल केले. शकुंतला यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.