पिंपरी : देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. तिघांनी एका महिलेला मारहाण करत दोन वर्षाच्या मुलावर तलवार फिरवून खानदान संपवून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेने हातातील तलवार हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. ही घटना हा रविवारी (दि.16) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास देहुरोड येथे घडली आहे.
याबाबत किवळे परिसरातील जुनवणे वस्ती येथे राहणाऱ्या 46 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नेहा जोगदंड (वय-32 रा. महादेव वाडी, खडकी) व तिच्या इतर दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला देहूरोड येथे वडापावच्या हातगाडीवर असताना संशयित महिला त्या ठिकाणी आली. तिने फिर्यादीस चहा बनवण्याच्या भांड्याने कानावर मारुन जखमी केले. यामध्ये फिर्यादीच्या कानातील झुमका पडून गहाळ झाला. फिर्यादी यांची सून भांडणे सोडवण्यासाठी आली असता संशयिताने सुनेला देखील मारहाण करत मोठमोठ्या शिवीगाळ केली.
दोन वर्षीय चिमुकल्यावर तलवार फिरवली
फिर्यादीच्या दोन वर्षीय नातवावर तलवार फिरवून तुमचे खानदान संपवून टाकणार, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी नेहा हिने हातातील तलवार हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. तर तिच्या साथीदारांनी फिर्यादी यांना अश्लील शिवागाळ करत तुम्ही आमच्या नादी लागलात तर तुमचे खांनदान संपवून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.