पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांनी दुचाकीचे टोईंग केले असता दोन दुचाकी चालकांनी वाहतूक पोलिस महिलेला अरेरावी करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच टोईंग व्हॅन अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार चिंचवड येथे लिंक रस्त्यावर शनिवारी (दि. १४) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद राजेंद्र पवार (वय-३३, रा. खडकी), एक महिला (वय-२८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार सुप्रिया बोऱ्हाडे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया बोऱ्हाडे या चिंचवड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. त्या शनिवारी टोईंग व्हॅनवर कर्तव्यावर होत्या. लिंक रोड वरील एल्प्रो मॉल जवळ नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी टोईंग व्हॅनमध्ये भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी एक संशयित व्यक्ती त्या ठिकाणी आला. पोलिसांनी त्यांची दुचाकी देखील नो पार्किंगमध्ये पार्क केल्याने टो केली होती.
त्या कारणावरून संशयितांनी पोलिस अंमलदार सुप्रिया बोऱ्हाडे यांना त्यांची गाडी सोडण्यास सांगितले. त्यावर ‘नियमानुसार दंड भरून वाहतूक विभागाच्या कार्यालयातून गाडी घेऊन जा’ असे उत्तर बोऱ्हाडे यांनी दिले. त्यावरून संशयितांनी बोऱ्हाडे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात बोऱ्हाडे यांचा मोबाईल रस्त्यावर पडल्याने फुटला. तसेच संशयितांनी टोईंग व्हॅन अडवून गाडी सोडण्यासाठी दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल करंबळकर करीत आहेत.