हिंजवडी, (पिंपरी) : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीएमआरडीकडून सुरू असणाऱ्या माण-मारूंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान रणगाड्याचे बॉम्बशेल सापडळल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी हे बॉम्बशेल ताब्यात घेतले आहेत. याबाबत संरक्षण विभागाच्या सदन कमांडला कळविण्यात आले असून खबरदारी म्हणून पुढील कार्यवाहीसाठी हे बॉम्बशेल त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत माण-म्हाळुंगे टाऊनशिप स्कीम ई – ३ कन्वर्ट साईट, ब्ल्यू रिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पीएमआरडीएमार्फत पुलाचे काम सुरु आहे. बुधवारी ३ एप्रिल रोजी दुपारी जेसीबीने खोदकाम करून माती काढत असताना कामगारांना बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित वस्तूची पाहणी केली. त्यामध्ये रणगाड्याच्या बॉम्बचा पुढील भाग असल्याचे आढळून आले.
दरम्यान, बॉम्बशोधक-नाशक पथकाने पाहणी करून ते ताब्यात घेतले आहे. मात्र, हे बॉम्बशेल खूप जुने असल्याने ते जिवंत आहे की निकामी हे अद्याप समजू शकलेले नाही. संरक्षण विभागाला याबाबत कळविण्यात आले असून हे बॉम्बशेल सदन कमांडच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संरक्षण विभागाकडून त्याची पाहणी केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.