पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीबरोबर असलेले प्रेमसंबंध पसंत नसल्याने भावाने तरुणाला बोलावून घेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना भोसरीतील यमुना कॉलनीत शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत राम गोरखनाथ पेंडलवाल (वय-२४, रा. यमुना कॉलनी, लांडगे वस्ती, भोसरी) हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी राम याच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम संभाजी पांचाळ (वय-२०, रा. भोसरी) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम पेंडलवाल आणि शुभम पांचाळ हे मित्र आहेत. राम याचे शुभम याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. ते शुभम याला माहिती झाल्याने शुभम याने राम याला फोन करुन घराबाहेर बोलावून घेतले. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. त्यानंतर शुभम मित्रासह पळून गेला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.