पिंपरी : मित्रांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करताना कानाखाली मारल्याच्या रागातून मित्रावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोकणेनगर, काळेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी प्रशांत नागेश जाधव (वय 27, रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सागर शिंदे (वय 22, रा. प्रेमलोक कॉलनी, राजेवाडेनगर, काळेवाडी) आणि चेतन ऊर्फ सुजल कोरे (वय 20, रा. काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर शिंदे हा फिर्यादी प्रशांत जाधव यांचा मित्र आहे. सागर शिंदे आणि प्रशांत सोनवणे यांच्यात भांडणे सुरु होती. त्यावेळी प्रशांत जाधव याने मध्यस्थी करीत भांडण सोडविली. त्यावेळी प्रशांत यांनी सागरच्या कानाखाली मारली. त्या गोष्टीचा राग आल्याने सागर आणि चेतन यांनी जाधव यांना जिवे मारण्याची धमकी दिली. सागर व चेतन हे प्रशांत जाधव याला म्हणाले की, “तुला लई माज आलाय काय? तू माझ्या कानफटात का मारलीस. तुला आज सोडत नाही, तुझी विकेट टाकतो,” असे बोलून त्यांनी प्रशांत याला हाताने मारहाण केली. तसेच त्याच्या ओठावर, डोक्यात, गालावर, हाताचे मनगटावर ब्लेडने वार केले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहे.