पिंपरी : चाकण-काळूस रस्त्यावर असलेल्या आगरवाडी येथे मक्याच्या शेतात गांजाचे पिक घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतकऱ्याने मक्याच्या शेतात गांजाची तब्बल ६६ झाडे लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई करत ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा २३ किलो गांजा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली.
सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय-६५, रा. आगरवाडी रस्ता, चाकण) असं अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना चाकण-काळूस रस्त्यावर असलेल्या आगरवाडी येथे एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चाकण-काळूस रस्त्यावरील सदाशिव देशमुख यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.
त्यावेळी मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. आठ ते दहा फूट उंचीची ६६ झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन २३ किलो असून किंमत ११ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त केली असून पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.