लोणावळा (पुणे) : अहमदनगरच्या लोणी प्रवरा येथील बाळासाहेब विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थाचा पवना धरण परिसरातील ठाकुरसाई येथे पवना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांची सतर्कता आणि धाडसामुळे एका तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मनिष शंकर शर्मा (वय-२०, रा.मुंबई) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर आदित्य सचिन बुंदेले (वय-२०, रा. नागपूर) ह्या विद्यार्थ्याला वाचविण्यात स्थानिकांना यश आलं आहे.
तर इतर दोघेजण तत्काळ पाण्याबाहेर आले. दोघे बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला. यावेळी लोणावळा आणि मूळचे ठाकुरसाईचे असलेले शिवदुर्ग मित्रचे सदस्य आकाश शांताराम मोरे व ठाकुरसाईचे सुनील भाऊ ठाकर यांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेत पाण्यात उडी मारुन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आदित्यला वाचविण्यात दोघांना यश आले, मात्र मनिषला वाचविण्यात अपयश आले. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.