पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पाणीपुरवठा व जलनिसारण विभागाचे तत्कालीन लेखाधिकारी यांच्यावर ज्ञात उत्पनापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तत्कालिन लेखाधिकारी यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर बाबुराव शिंगे ( तत्कालीन लेखाधिकारी, पाणिपुरवठा व जलनिसारण विभाग, पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे, वर्ग-२), पत्नी भाग्यश्री किशोर शिंगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक माधुरी चंद्रकांत भासले यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पाणिपुरवठा व जलनिसारण विभागाचे तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगे यांनी १८ डिसेंबर १९८७ ते ३१ जुलै २०१७ या परिक्षण कालावधीत संपादीत केलेल्या अपसंपदेबाबत त्यांना पुरेशी व वाजवी संधी देऊन देखील ते समाधानकारकरित्या हिशोब देवू शकले नाहीत. तसेच त्यांनी संपादित केलेली मालमत्ता त्यांच्या ज्ञात स्त्रोताच्या उत्पन्नाच्या प्रमाणाशी विसंगत आहे.
शिंगे यांनी ५० लाख ४० हजार २६४ रुपये (१०२.६९%) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण करुन उद्देश पुर्वक स्वतःला व त्यांच्या पत्नीला अनुचितपणे अवैधरित्या समृद्ध केले. या सर्व प्रकरणात त्यांची पत्नी भाग्यश्री किशोर शिंगे यांनी त्यांना अपप्रेरणा दिली आहे. सदरची मालमत्ता ही भ्रष्ट मार्गाने धारण केलेली अपसंपदा आहे. ही संपदा त्यांच्या लोकसेवक सेवा कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे त्यांचेविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे हे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.