पुणे : घरातील महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरकडून पाच लाख रुपये खंडणी घेऊन त्यानंतर कोयत्याने हल्ला करुन पुन्हा २५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना २ डिसेंबर २०२२ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सांगळे , रुद्र चाटे व त्यांचे इतर पाच साथीदार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. कामावरुन कमी केले व पैसे दिले नाहित याचा राग मनात धरुन अशोक सांगळे याने फिर्यादी यांना धमकी दिली. आरोपी अशोक सांगळे याने फिर्यादी यांच्या घरातील महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाच लाख रुपये खंडणी घेतली.
त्यानंतर आरोपीने आणखी २५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी अशोक सांगळे याने दिली. तसेच रुद्र चाटे आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी भोसरी येथील पी.एम.टी. ऑफिस येथे फिर्यादी यांची गाडी आडवून त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केला.
याप्रकरणी सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.