पिंपरी : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढचं नाही तर बँकांमधून 80 लाख 72 हजार 502 रुपयांचे गृहकर्ज घेतले, ते कर्ज बुडवून बँकांची देखील फसवणूक केली. याप्रकरणी दोन सीए, वकील यांच्यासह 14 जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन यातील ५ जणांना अटक केली आहे. हा प्रकार बावधन येथील हॉटेल ला-बाली , हॉटेल पिंगारा तसेच तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालय मावळ-2 येथे सप्टेंबर 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी अजिंक्य जगदीश पाटील (वय- 24 रा. सेनापती बापट रस्ता, पुणे) यांनी शुक्रवारी 31 मे रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून वासूदत्त भारत डुबे (वय-34 रा. बावधन), चंद्रकांत मोरे (वय-28, रा. खुर्द फुलंब्री, संभाजीनगर), प्रकाश बळीराम थोरात (वय-40, रा. बल्लूर दुर्ग, परभणी), कृतिका पोलावर (वय-32, रा. बावधन), विनोद अण्णा शिंदे (वय-25 रा. पिंपरी राजा, संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
यांच्यासह सीए सागर कोकाटे (माजीवाडा, ठाणे), सीए नितीन चंद्राणी (वय-35, कोंढवा), वसीम जिलानी शेख (वय-35, रा. नेरुळ), ॲड. विष्णूदास चंडेल (वय-32, रा. मालेवाडी, परभणी), टेक्सास कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचा प्रमुख अनिल क्षत्रिय (लोढा सुप्रमस 2, वागळे इस्टेट, ठाणे), मधुसुदन टेक्सास कंपनीचे (रा. वागळे इस्टेट, ठाणे), बँकेचा प्रतिनिधी उत्तम शेळके (वय-35, नऱ्हे, पुणे), दीपक सखाराम जंगम (वय-29, रा. वाघोली, पुणे), विजय साहेबराव शिंदे (रा. पिंपरी राजा, संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वासूदत्त डुबे याने फिर्यादी अजिंक्य पाटील यांना १ कोटी रुपये गुंतवणुकीच्या बदल्यात एक महिन्यात १ कोटी 75 हजार रुपये मिळणार असे आमिष दाखवले. त्यानंतर 90 लाख रुपये देण्यास भाग पाडून यामधील फिर्यादी अजिंक्य यांना 50 हजार रुपये रक्कम देऊन उर्वरित 89 लाख 50 हजार रुपये स्वत:साठी वापरून फिर्यादी अजिंक्य यांची फसवणूक केली.
दरम्यान, आरोपी विनोद शिंदे, दीपक जंगम आणि विजय शिंदे यांनी कट रचून अशिक्षित व अल्पशिक्षित व्यक्तींना ते उच्चशिक्षित असल्याचे भासवून दिले. तसेच लिस्टेट कंपनीत नोकरी करत असल्याचे बनावट कागदपत्रे आणि बनावट सॅलरी स्लीप बनवल्या. सॅलरी स्लीपच्या आधारावर अॅक्सीस बँकेतून 16 लाख 97 हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या हिंजवडी शाखेत एकूण तीन होम लोनद्वारे एकत्रित 80 लाख 72 हजार 502 रुपये कर्ज मंजूर करुन घेतले.
आरोपींनी बँकेतून लोन मंजूर करुन घेताना बाजारभावापेक्षा जास्त मूल्यांकन किंमत रक्कम मंजूर करून घेतली. कर्ज खाते बुडित करुन बँकांची देखील फसवणूक करत असल्याने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सपकळ करत आहेत.