पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. गहाळ झालेले तसेच हरवलेले तब्बल १० लाख १४ हजार ७०० रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ७० स्मार्ट फोन पोलिसांनी शोधून काढले आहेत. हस्तगत केलेले सर्व फोन लवकरच मूळ मालकांना परत केले जाणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात २०२३ व मार्च २०२४ या दरम्यान अनेक मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याबाबत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. पथकाने गहाळ मोबाईलच्या तक्रारींची माहिती जमा केली. पोलिस अंमदलार प्रवीण कांबळे यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलिस अंमलदार नागेश माळी व पोपट हुलगे यांच्याकडून माहिती प्राप्त केली. पोलीस अंमलदार प्रविण कांबळे यांनी हरवलेल्या मोबाईलचे तांत्रिक दृष्ट्या तपास करुन गहाळ झालेले जे मोबाईल अॅक्टीव्ह झाले आहेत त्यांची माहिती जमा केली.
दरोडा विरोधी पथकातील अंमलदार यांना ॲक्टिव्ह मोबाईलच्या वापरकर्त्यांचे नाव व पत्ते देण्यात आले. पथकातील अंमलदारांनी ॲक्टिव्ह झालेले १० लाख १४ हजार ७०० रुपये किमतीचे ७० स्मार्ट फोन मोबाईल हे अमरावती, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, सोलापूर इत्यादी जिल्ह्यातून शोधून काढले. यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जमा केले असून मूळ मालकांना लवकरच प्रदान करण्यात येणार आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, उप निरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार प्रवीण कांबळे, महेश खांडे यांच्या पथकाने केली.