पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने नवजात बाळांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सहा महिलांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी महिलांना न्यायालयाने मंगळवार १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमधील नर्सच्या मदतीने आरोपी महिला हे काम करायच्या. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या टोळीने आतापर्यंत सहा नवजात बालकांची विक्री गरजू दाम्पत्यांना केल्याचं समोर आलं आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील हवालदार वंदू गिरे यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलिस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार वंदू गिरे यांना शुक्रवारी (दि. १२) माहिती मिळाली की, काही महिला या नवजात बालकाची विक्री करण्यासाठी वाकड येथील जगताप डेअरी परिसरात येणार आहेत. त्यानुसार वाकडच्या तपास पथकाने सापळा रचला. त्यावेळी शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास दोन रिक्षामधून काही महिला आल्या. त्यांच्याबाबत संशय आल्याने दोन्ही रिक्षांमधील सहा महिलांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील नवजात बालकाबाबत विचारणा केली असता ६ महिलांनी मिळून त्यांच्यातीलच एका महिलेचे ७ दिवसांचे नवजात बालक ५ लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. अटक केलेल्या संशयित महिला अतिशय सराईत असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कौशल्यपूर्व तपास केला. त्यांनी यापूर्वी साथीदारांच्या मदतीने अशाचप्रकारचे लाखो रुपयांसाठी नवजात पाच बालकांची तस्करी केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
ही कामगिरी वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक फौजदार राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार वंदु गिरे, रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तुपसुंदर यांच्या पथकाने केली.