पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून एक लाख रुपये घेताना ओंकार भरत जाधव या खासगी व्यक्तीला शनिवारी (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमधून १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना जाधव याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकारामुळे एसीपी पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
जाधव हा उद्योगनगरीतील वाकडचा रहिवासी असून, एसीपी पाटील यांच्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची लाच या प्रकरणातील तक्रारदाराकडे मागितली होती. त्यातील एक लाखाचा पहिला हफ्ता घेताना तो पकडला गेला. योगायोगाने त्याचे व तक्रारदाराचेही वय सारखेच (३२) आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग येथे कात्रज-कोंढवा बायपास रोड येथील जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची चौकशी सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे सुरु होती. यामध्ये तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ५ पाच लाख रुपये लाचेची मागणी मुगुटलाल पाटील यांच्या सुचनेवरून ओंकार जाधव यांनी केली होती.
याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली होती. या तक्रारीवरून चौकशी केली असता मुगुटलाल पाटील यांच्यासाठी ओंकार जाधव या व्यक्तीने ५ लाख रुपये लाचेची मागणी करुन १७ फेब्रुवारीला पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी नितीन जाधव, पीआय प्रसाद लोणार, सहाय्यक फौजदार मुकुंद अयाचित, हवालदार चंद्रकांत जाधव आणि पोलीस शिपाई दिनेश माने या पथकाने केली. याप्रकरणी जाधव याच्याविरुद्ध पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.