पिंपरी (पुणे) : वाकड येथील एका जिम ट्रेनरला यू ट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करायला सांगून ३५ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. वेगवेगळे टास्क देऊन ४२ वर्षीय जीम ट्रेनरची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. वाकड येथे १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी योगेश माधवराव सोनार (४२, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी २६ फेब्रुवारीला वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शांभवी सोनी आणि टेलीग्राम खाते धारक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी योगेश हे ‘बाॅडी बिल्डर’ असून ‘फिटनेस’बाबत ते प्रशिक्षण देतात. तसेच जीम ट्रेनस म्हणून देखील काम करतात. शांभवी सोनी आणि इतर संशयितांनी फोन करून योगेश यांच्याशी संपर्क साधला. यावेळी कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता केवळ व्हॉटसअपद्वारे यु ट्यूब ॲपवर सबस्क्राईब करून टास्क पूर्ण करा. यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल, असं सांगितले.
त्यानंतर टेलीग्राम चॅनेल लिंक पाठवून त्यावर टास्कसाठी त्यांची नोंदणी कार्याला सांगितले. त्यांना वेगवेगळे टास्क देऊन ते खरे असल्याचे भासवले. त्यातून योगेश यांना सुरुवातीला फायदा होत असल्याचे भासवले. त्यांच्याकडून टास्कसाठी वेळोवेळी वेगवगेळ्या बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले. त्यानुसार योगेश यांनी एकूण ३५ लाख २५ हजार ३६४ रुपये खात्यांमध्ये टाकले. मात्र, त्यांना कोणताही नफा किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे पुढील तपास करीत आहेत.