पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा, चरस, एल.एस.डी. डॉट पेपर जप्त केले आहेत. तसेच पाच जणांना पोलिसांनी अटक केले असून त्यांच्याकडून 20 लाख 89 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 17 मार्च रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सांगवी स्मशानभूमीजवळ असलेल्या एस.टी. कॉलनीच्या मैदानावर करण्यात आली आहे.
ओंकार उर्फ सोन्या महादेव लिंगे (वय 26), अनिकेत अनिल गोडांबे (वय 25), रोहन उत्तम कांबळे (वय 21), रुपेश गौतम जाधव (वय 21), रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे (वय 24, सर्व रा. पी.डब्ल्यु.डी. कॉलनी, दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर विशाल उर्फ महाद्या गोरख कदम, सेनानी, हर्ष (रा. बाणेर), मयूर प्रवीण बाराथे (पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्या विरोधात एन. डी. पीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक विजय दिपक दौंडकर (वय-38) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी स्मशान भूमिजवळ असलेल्या एस.टी. कॉलनीच्या मैदानावर अडोशाला काहीजण अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले होते. याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 60 हजार रुपये किमतीचा 7 किलो 200 ग्रॅम गांजा, चार लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे 175 ग्रॅम चरस, 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 12 एलएसडी डॉट पेपर, सहा मोबाईल फोन, एक कार, तीन दुचाकी असा एकूण 20 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींसोबत असलेला मयूर बाराथे हा पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणाहून पसार झाला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता विशाल कदम याने गांजा आणून दिल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे करत आहेत.